Logo

उत्पन्नानुसार वाढवा गुंतवणूक

आर्थिक नियोजन: गुंतवणुकीचं गणित

असंख्य सामान्य गुंतवणूकदारांना आर्थिक नियोजन, गुंतवणूक योजना, दीर्घकालीन महागाईची गृहितकं आणि त्याचे परिणाम, आर्थिक उद्दिष्टे इत्यादी संकल्पना आणि त्यासाठी करावी लागणारी आकडेमोड ह्यांचा मनस्वी तिटकारा किंवा अनामिक भीती (fobia) असते. त्यामुळेच ह्या सगळ्या गोष्टी आपल्या भविष्यासाठी महत्त्वाच्या आहेत हे समजून सुद्धा त्याकडे दुर्लक्ष किंवा चालढकल करणे हेच चालू राहातं. त्यातून चुकीचे पर्याय गुंतवणूक म्हणून निवडले जातात. सर्व मराठी वाचकांसाठी हे विषय सुलभ करून ही भीती दूर करणे हेच ह्या लेखांमागचे उद्दिष्ट आहे.

गेल्या आठवड्यात आपण महागाईच्या तडाख्याने आपल्या भविष्यातील आर्थिक गरजा कशा अनेक पटींनी वाढत जातील आणि त्यानुसार दीर्घकालीन उद्दिष्टे कशी निश्चित करावीत ते बघितले. त्यासाठी सुलभ अंदाजाचे आडाखेही आपण पाहिले. आपल्या कुटुंबाच्या आर्थिक नियोजनातील ही पहिली पायरी होय. हे म्हणजे प्रवासाला निघताना कुठे, कधी पोचायचय, किती अंतर कापायचंय ते ठरवणे.

एकदा आपण भविष्यातील आपल्या आर्थिक गरजा ठरवू शकलो तर त्यानंतरची पायरी म्हणजे योग्य वेळी उद्दिष्टपूर्तीसाठी शिल्लक कालावधीनुसार आपण किती गुंतवणूक करायला हवी ते ठरवणे. थोडक्यात, इच्छित स्थळी योग्य वेळी पोचण्यासाठी प्रतितास, प्रतिदिन किती अंतर कापले पाहिजे त्याचा अंदाज बांधणे.

इथे आपल्याला काही गृहितकं निश्चित करायला हवीत. आपलं पाहिलं गृहितक आहे की इक्विटी म्युच्युअल फंडातील दीर्घकालीन गुंतवणुकीतून दरसाल सरासरी १२% प्रमाणे परतावा मिळेल. गेल्या वेळी म्हटल्याप्रमाणं भविष्यात नक्की काय होईल हे सांगणे अशक्य असले तरी आपल्याला वास्तववादी अंदाज बांधणे गरजेचं आहे. गेल्या ३० वर्षातील सेन्सेक्स किंवा निफ्टीचा आढावा घेतला तर वार्षिक सरासरी १५-१६% दराने वाढ झाल्याचे दिसून येते. अनेक म्युच्युअल फंडातील योजनांनी २०-२५% दरानेही परतावा दिला आहे. मात्र आपण उद्दिष्टपूर्तीच्या खात्रीसाठी परताव्याची अपेक्षा कमीतकमी ठेऊ.

दुसरं गृहितक असं की आपण दर महिना ठराविक रक्कम म्युच्युअल फंडात गुंतवू (Systematic Investment Plan) आणि ती रक्कम दरवर्षी ५% ने वाढवत नेऊ. म्हणजेच जर दरमहा रू १,०००/- ने सुरुवात केली तर १३व्या महिन्यापासून ती रू १,०५०/- होईल आणि २५व्या महिन्यापासून ती रू १,१०२.५/- होईल. असं पुढील १०-२०-३० वर्षं आपण करत राहू. असं ठरवण्यामागील कारण म्हणजे बहुतेक लोकांचं उत्पन्न दरवर्षी वाढत जातं, त्यामुळे गुंतवणुकीत वाढ करत राहणं आवश्यक असतं. त्याचप्रमाणे मोठी उद्दिष्टं साध्य करण्यासाठी एकदम पहिल्या वर्षापासून मोठी गुंतवणूक सुरु करणं अनेकांना कठीण वाटू शकते. त्यामुळे उत्पन्नाप्रमाणे गुंतवणूक वाढवत नेणे कधीही श्रेयस्कर.

 

आता ह्या गृहीतकांनुसार आकडेमोड केल्यास दरमहा रू १०००/- ने सुरु केलेल्या गुंतवणुकीने किती पुंजी जमा होईल त्याचे सुलभ अंदाज पुढीलप्रमाणे

वर्षांनंतर

दरमहा रू 1000 + 5% वार्षिक वाढ + 12% सरासरी वार्षिक परतावा ह्या गृहीतकांनुसार जमा होणारी पुंजी

10

रू 2.8 लाख

15

रू 6.5 लाख

20

रू 14 लाख

25

रू 28 लाख

30

रू 53 लाख

35

रू 1 कोटी

 

अर्थात हे सुलभ अंदाज आहेत. काटेकोर आकडेमोड केल्यास उत्तरं थोडीफार मागंपुढं होऊ शकतात.

ह्याचा उपयोग कसा कराल?

गेल्या आठवड्यात दिलेल्या कोष्टकानुसार आपण हे शोधले होते की आज पासून २५ वर्षांनी निवृत्त होण्यासाठी मला रू ३ कोटींची आवश्यकता असेल. आता वरील कोष्टकावरून आपण हे शोधू शकतो की आज सुरु केलेली रू १००० ची मासिक गुंतवणूक २५ वर्षांनंतर रू २८ लाख देईल. म्हणजेच रू ३ कोटी जमा करण्यासाठी मला रू ३ कोटी भागिले २८ लाख = रु १०,७०० म्हणजेच सुमारे रू ११,००० मासिक गुंतवणूक सुरु करून ती दरवर्षी ५% ने वाढवत न्यायला हवी.

महिना रू १ लाख उत्पन्न असलेल्या एखाद्या ३० वर्षाच्या पतीपत्नीला आपल्या २ वर्षाच्या मुलीच्या पदवीशिक्षणासाठी १५ वर्षांनी रू २५ लाख जमवायचे असल्यास, वरील कोष्टकानुसार सुमारे रू ४०००ची मासिक गुंतवणूक सुरु करावी लागेल. तसेच तिच्या उच्चशिक्षणासाठी २० वर्षांनी रू ५० लाख लागणार असतील तर त्यासाठी रू ३५०० ची मासिक गुंतवणूक सुरु करावी लागेल. त्याचप्रमाणे त्यांच्या निवृत्तीसाठी ३० वर्षांनी रू ५ कोटी लागणार असतील तर अजून रू १०,००० ची मासिक गुंतवणूक लागेल. म्हणजे दरमहा रू १७,५००/- ने गुंतवणूक सुरुवात करून आणि दरवर्षी त्यात ५% वाढ करून त्यांना ही तीनही उद्दिष्ट साध्य करता येतील.

म्हणजेच, अवघ्या १५-२० मिनिटात एका कुटुंबाचं आर्थिक नियोजनाचं गणित फार आकडेमोड न करावी लागता आपण तयार केलं. आहे नं सोप्पं?

महागाईदरामुळे आपले खर्च भविष्यात कसे वाढत जातील त्याचे सुलभ अंदाज कोष्टक गेल्या आठवड्यात दिलं होतं ते वाचकांच्या संदर्भासाठी पुनरुद्धृत करत आहोत.

उद्दिष्टपूर्तीसाठी शिल्लक वर्ष

खर्चात किती वाढ होईल

४०% वाढ किंवा आत्ताच्या खर्चाच्या १.४ पट

१०

१००% वाढ किंवा आत्ताच्या खर्चाच्या २ पट

१५

२००% वाढ किंवा आत्ताच्या खर्चाच्या ३ पट

२०

३००% वाढ किंवा आत्ताच्या खर्चाच्या ४ पट

२५

५००% वाढ किंवा आत्ताच्या खर्चाच्या ६ पट

३०

७००% वाढ किंवा आत्ताच्या खर्चाच्या ८ पट

 

सर्व वाचकांना येणाऱ्या नवीन वर्षाच्या अनेक शुभेच्छा आणि ही विनंती की, नवीन वर्षाची सुरुवात त्यांनी आपापल्या कुटुंबासाठी ह्या सोप्या सुलभ पद्धतीने आर्थिक नियोजनाचे गणित मांडून करावी.

 

--- प्राजक्ता कशेळकर

 

 

 

 

तिसऱ्या टप्प्यात आपण नक्की कुठं गुंतवणूक करावी त्याचा परामर्ष घेऊ.

 

 

‘अज्ञानात सुख असतं’ असं म्हणतात. मात्र ते क्षणिक असतं. ज्या गोष्टीचं सोंग आणता येत नाही